महाराष्ट्र

अतिक्रमणविरोधी अर्जाचा राग; सामाजिक कार्यकर्त्यास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

ज्योतिबानगर, बुधगाव येथे अतिक्रमण हटविण्याचा अर्ज ग्रामपंचायतीत दाखल केल्याचा राग मनात धरून एका सामाजिक कार्यकर्त्यावर धक्काबुक्की, गलिच्छ शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यावर गटाराच्या जागेवर शेजाऱ्यांनी उभे केलेल्या स्वच्छतागृहाविरोधात सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत यशवंत यमगर यांनी तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी यमगर (वय ३५, रा. ज्योतिबानगर, बुधगाव, ता. मिरज) यांनी बुधवारी पोलिसांत धाव घेत संशयित महिला व एका पुरुषाविरोधात तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीनंतर दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यमगर यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच गटारीचे काम सुरु होणार आहे. गटाराच्या सीमारेषेत शेजारील कुटुंबाचे स्वच्छतागृह येत असल्याने त्यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाकडे लेखी अर्ज दिला होता. याचाच राग धरून आरोपींनी यमगर यांना धक्काबुक्की करत गलिच्छ शिवीगाळ केली आणि “पोलिसांत तक्रार करशील तर जीवे मारू” अशी धमकी दिली. या क्षोभात यमगर यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली असून अधिक तपास सुरू आहे.

शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेणार

यमगर हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून घडलेल्या प्रकारानंतर घाबरण्याऐवजी पुढील कायदेशीर लढाईसाठी आणि सामाजिक न्यायासाठी ते शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही