उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
मिरज ग्रामीण पोलीस, एलसीबी पथक घटनास्थळी व फॉरेन्सिक व्हॅन दाखल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज–टाकळी- सलगरे रोडवरील टाकळी गावच्या हद्दीत टाकळी–बोलवड रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह कुमार चौगोंडा पाटील यांच्या शेतात आढळून आला असून, ही घटना सकाळी सुमारे १ ते १.३० वाजताच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली.
टाकळी–बोलवड रोडवरील वडापात्राच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह पडलेला दिसताच नागरिकांनी तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तसेच सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक पाहणीत मृत महिलेचा मृतदेह चिन्ह अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मृत महिलेचे वय अंदाजे मध्यमवयीन असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन (न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र राज्य) घटनास्थळी बोलावण्यात आली आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून घटनास्थळी बारकाईने तपास करत विविध पुरावे संकलित करण्यात येत आहेत. मृतदेहाची छायाचित्रे, परिसरातील पुरावे तसेच मृत्यूशी संबंधित तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे.
सदर मृत्यू हत्या आहे की अपघाती मृत्यू, अथवा अन्य कोणत्या कारणामुळे झाला आहे, याचा तपास पोलीस विविध अंगाने करत आहेत. बेपत्ता महिलांची नोंद, तसेच आसपासच्या गावांतील माहिती संकलित करण्याचे काम पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे टाकळी, बोलवाड आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.