महाराष्ट्रसामाजिक

महार वतन हक्कासाठी रणसंग्राम, आझाद मैदानात दारोळेंचं आमरण अनुष्टान

मुंबई | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

मुंबई प्रतिनिधी | राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो एकर महार वतन जमिनींवर गिळांकट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर, सावकारांवर, भूमाफियांवर आणि भ्रष्ट प्रशासनावर शशिकांत दारोळे यांनी आझाद मैदानावर रणशिंग फुंकलंय.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत दारोळे ६ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणाच्या तयारीत उभे राहिले आहेत. मागण्या स्पष्ट आहेत, आवाज ठाम आहे. अनधिकृत जमिनी रद्द करा, वतनदारांना जमिनी परत करा.

गेल्या चार-पाच वर्षांत दारोळे यांनी पुणे, नाशिक, सातारा, मुंबईसारख्या ठिकाणी उपोषणांची मालिका उभी केली; पण प्रशासन मात्र बधीर… राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकारी वर्गाचं संगनमत, आणि दलालांचा खेळ यामुळे महार वतनदारांच्या जमिनींची लुट आणि फसवणूक दिवसाढवळ्या सुरुच आहे.

दारोळे यांच्या ठणठणीत मागण्या:
● महार वतन जमिनीवरील अनधिकृत व्यवहार रद्द करा.
● साठेखत, कुलमुखत्यारपत्रं तात्काळ रद्द करा.
● जमिनीवरील अतिक्रमण हटवा.
● कुळ हटवून जमीन मूळ वतनदारांना हस्तांतरित करा.
● जमिनी रिस्टोर करून वतनदारांच्या मालकीत परत द्या.

प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांवर दारोळे यांचा आरोप

“प्रशासन, राजकीय पुढारी आणि भूमाफिया यांनी संगनमताने वतनदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित केलंय. ५०-१०० स्टॅम्पपेपरवर साठेखत करून, सावकारांनी महार वतन जमिनी कवडीमोल भावात बळकावल्या. आज या जमिनींवर बांधकाम प्रकल्प, मोठमोठ्या कंपन्या, पेट्रोल पंप, नेत्यांचे ऑफिस, आणि कारखाने उभे राहिले आहेत, पण वतनदार मात्र उपाशी न बेघर……

दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जमिनींच्या विक्रीचे व्यवहार सर्रास चालू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता गुंठेवारी, प्लॉटिंग आणि हस्तांतरण सुरू आहे. हजारो तक्रारी असूनही कोणतीही कारवाई नाही.

कायद्याचं उल्लंघन आणि प्रशासनाची डोळेझाक

दारोळे म्हणतात की, या जमिनी आमच्या पूर्वजांच्या श्रमाचं फलित आहेत. त्या संरक्षित (Protected) आहेत. त्या परत मिळवण्यासाठी आम्ही लढू आणि मरू, पण माघार नाही. विलंबित न्याय, अर्धवट व्यवस्था आणि राजकीय दुर्लक्ष यामुळे वतनदारांना न्याय मिळत नाही. न्यायालयात प्रकरणं वर्षानुवर्षे प्रलंबित. हजारो तक्रारींच्या ढिगाऱ्यावर प्रशासन झोपलंय का ?

ज्यांची वतन जमीन हडप झाली आहे, फसवणूक झाली आहे, अतिक्रमण झालं आहे, त्यांनी आझाद मैदानात येऊन सहभागी होऊन लढ्याचं नेतृत्व घ्या. तक्रारी सादर करा, आवाज बुलंद करा. असे आवाहन शशिकांत दरोळे यांनी महार वतनदार याना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही