महालक्ष्मी देवीच्या अंगावरील सोन्या- चांदीचे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला ; लाखों रुपयांचा ऐवज लंपास

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | आरग येथील लक्ष्मीवाडी येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतील रक्कम तसेच गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या अंगावरील सोन्या- चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. यात साधारण लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी करत १८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली आहे. यानंतर चोरट्यानी मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मंदिर देखील सुरक्षित राहिले नसल्याचे बोलले जात आहे. मंदिरातील दानपेटी तसेच देवाच्या अंगावरील आभूषण चोरून नेले आहे.
महालक्ष्मी मंदिरात चोरटयांनी कुलूप तोडून प्रवेश करत दानपेटी उचलून नेली तसेच अडीच तोळे सोने आणि २ किलो चांदीचे दागिने देखील चोरून नेले आहे. दरम्यान, चोरीनंतर चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील पैसे काढून घेतले. यानंतर दानपेटी गावातल्या ओढ्यामध्ये फेकून दिली आहे. त्याचबरोबर चोरीच्या वेळी मंदीर परिसरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लंपास केला आहे.
दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक व डीवायएसपी प्राणिल गिल्डा घटनास्थळी धाव घेतली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीच्या डीव्हीआर लांबविल्याने चोरट्यांची ओळख पटू शकलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच गावानजिक असणाऱ्या आरगमध्ये पद्मावती मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ लक्ष्मीवाडी येथे घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.