महाविकास आघाडीच्या उमेदवारीमुळे मिरज पूर्व भागातील पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत..

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज ग्रामीण प्रतिनिधी | विकास कांबळे
विधानसभेचे वारे वाहू लागले असून मिरज विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मिरज विधानसभेसाठी मिरज पूर्व भाग हा अतिशय महत्त्वाचा व मतदानाच्या बेरजेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग समजला जातो. त्यामध्ये प्रत्येक गावात काँग्रेस व भाजपाचे गट कार्यरत आहेत. भाजप गट हा अत्यंत वेगाने काम करत असलेला दिसत आहे. जुन्या, दुरावलेल्या मित्रांना बरोबर घेऊन मैत्रीचा हात पुढे करून जोडण्याचे, बेरजेचे राजकारण भाजप करीत आहे. दुसरीकडे भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एकत्र आलेले पक्षच परस्परांना संपवायला निघाले आहेत. परंतु महाविकास आघाडीकडून नक्की कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागून राहिल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्ते मात्र संभ्रम अवस्थेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
गेली तीन विधानसभा हॅट्रिक केल्यानंतर परत भाजपाच्या पहिल्या यादीतील उमेदवार म्हणून सांगलीचे पालक मंत्री सुरेश खाडे यांची वर्णी लागली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडत कोणत्याही परिस्थितीत सुरेश खाडे यांना पराभव करून महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या मोहन वनखंडेमुळे उत्सुकता वाढली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी बद्दल पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून आज विज्ञान माने यांचा अर्ज दाखल करण्यात आला. पक्षाचे अर्ज भरण्याचे कार्यक्रम चालू झाला तरी अजून महविकास आघाडीची जागा कोणाला काँग्रेसला का उबाठा गटाला हे निश्चित होत नसल्याने विधानसभा मतदार संघातील निवडणूक हि तिरंगी होणार की चौरंगी होणार याकडे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा लक्ष लागून राहिला आहे.
यातच दुसऱ्या बाजुला एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आपली उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांना राजरत्न आंबेडकर व जरांगे यांचा पाठिंबा आहे, असे सांगितलं जात आहे. आता तर त्यांनी मतदार संघात दौरे चालू केले आहेत. ही परस्थिती लक्षात घेता महाविकस आघाडीत काय बिघाडी झाली की काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
तसेच भाजप मध्ये मोहन वनखंडे यांना मानणारा ग्रामीण भागात मोठा गट असून तो सध्या भाजप मध्ये असल्याने काही कार्यकर्त्यांच्या मते जो पर्यंत मोहन वनखंडे यांची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत भाजप पक्ष न सोडण्याचे संकेत दिले जाते आहेत. त्यामुळे नक्की उमेदवार कोण यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.