महाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियान’मध्ये मिरज पंचायत समितीचा राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मिरज | माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित ‘माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा २०२४–२५’ मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित क्षेत्रवाढ आणि जलसंधारण या क्षेत्रांत केलेल्या प्रभावी कामगिरीची ही दखल मानली जात आहे.

हा सन्मान सोहळा शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य देवव्रत होते. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मिरज तालुक्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. गावागावांत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त उपक्रम, पाणी अडवा-पाणी जिरवा अभियान आणि पर्यावरणपूरक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे तालुक्याने राज्यपातळीवर दुसरा क्रमांक मिळवला.

या सोहळ्यात मंत्री पंकजा मुंडे व पर्यावरण विभागाच्या सचिव श्रीमती राजश्री भोज यांच्या हस्ते मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी विस्तार अधिकारी शिवानंद कोळी, मधुकर हराळे, टाटा ऑपरेटर सनदी यांच्या समवेत पुरस्कार स्वीकारला. या यशामुळे मिरज तालुक्याच्या कार्याची राज्यभर दखल घेतली जात आहे.

तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यात अधिक व्यापक उपक्रमांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही