महाराष्ट्र

मातंग तरुणावर हल्ल्याच्या निषेधार्थ वाघोली पोलीस स्टेशनसमोर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे धरणे आंदोलन

पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

वाघोली येथील तरुण आकाश झेंडे यांच्यावर घरात घुसून कोयत्याने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन महासभाच्या वतीने गुरुवार, दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी वाघोली पोलीस स्टेशनसमोर जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले. आरोपींवर अट्रॉसिटी ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

आकाश झेंडे या मातंग समाजातील तरुणावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. आंदोलकांनी आरोपींना अटक करा, पोलीस प्रशासन जागे व्हा, अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये तातडीने आणि कडक कारवाई करणे आवश्यक आहे. अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंदविताना पोलिसांची उदासीनता हा गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच फिर्यादींना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राज्य प्रवक्ते अॅड. अरुण सोनवणे यांनी सांगितले की, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा आकाश झेंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विकास शिंदे यांनी इशारा दिला की, पुढील 10 दिवसांत आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई न झाल्यास 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

जिल्हा प्रवक्ते ईश्वर इंगळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, घटनेला दीड महिना उलटूनही आरोपींवर कारवाई झालेली नाही. इतका गंभीर गुन्हा करूनही आरोपी समाजात मोकाट फिरत आहेत, ही बाब धक्कादायक आहे. पोलिसांचा आरोपींवर धाक नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या आंदोलनाचे आयोजन जयश्रीताई शिंदे व विनोद हिवराळे यांनी केले. यावेळी महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अलका गुंजाळ, विकास शिंदे, विनोद हिवराळे, सौ. जयश्रीताई शिंदे, श्री. ईश्वर इंगळे, खेड तालुका संघटक सोमनाथ लोंढे, भाऊसाहेब वायदंडे, सुमित शिंदे, सौ. चतुराताई वायदंडे, शितलताई पवार, सौ. मिराबाई पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही