विदर्भ

मातंग समाज पुढाऱ्यांच्या निर्णय क्षमतेवर डॉ. खंडारे यांची टीका

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

अनुसूचित जातींपैकी मातंग समाजाची लोकसंख्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असूनही राजकारणात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त करत मातंग समाजाच्या पुढाऱ्यांची राजकीय निर्णय क्षमता शून्य आहे, अशी खरमरीत टीका मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ. रेखा कैलास खंडारे यांनी केली.

डॉ. खंडारे यांनी परभणी पशुवैद्यकीय विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर पुणे येथील शोलक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळात सेवा केली होती. मात्र पुढाऱ्यांच्या दादागिरीला प्रतिकार केल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिव-फुले-शाहू-बाबासाहेब-अण्णाभाऊ यांच्या विचारांवर आधारलेली सामाजिक व राजकीय लढाई हाती घेतली. दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा तसेच बिगर सातबारा शेतकऱ्यांसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.

या कार्याची दखल घेत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व पिरिपा महामंत्री सरकार इंगोले यांनी त्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला. “जातीच्या व रक्ताच्या नात्यापेक्षा चळवळीचे नाते मोठे” असे इंगोले म्हणाले. यावेळी अखिल भारतीय मातंग समाज संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे यांनी मातंग समाजाच्या राजकीय अस्मितेसाठी सर्व संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे मत मांडले.

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश इंगळे म्हणाले की, वाशीम जिल्ह्यात लोकसंख्या पहिल्या क्रमांकावर असूनही नगरपरिषदेत एकही नगरसेवक नाही, जिल्हा परिषदेत सदस्य नाही. सर्व पक्षांनी समाजाचा वापर करून डावलले. त्यामुळे यापुढे संघटित होऊन आक्रमक भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. यासाठी लवकरच जिल्ह्यात मातंग समाजाची राजकीय अस्मिता परिषद आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली.

या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आटोटे गुरुजी, मालती गायकवाड, निर्मला कांबळे, कांताबाई जाधव, स्वप्नील कांबळे, राजू इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही