“मानोरात वाघिण दाखल ; ‘लेडी सिंघम’ नयना पोहेकर ठाणेदार !”

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मानोरा | गुन्हेगारांची उडणार धांदल, आता ठाण्यात नयना पोहेकरांची खणखणीत कमान! वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदाची धुरा कर्तव्यकठोर, धाडसी व जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ‘लेडी सिंघम’ नयना पोहेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी, महिलांवरील अत्याचारांविरोधात कडक भूमिका आणि पोलिसी शिस्त यामध्ये कायम आघाडीवर असलेल्या पोहेकर यांनी यापूर्वी अकोला येथे दामिनी पथक प्रमुख म्हणून तसेच अनसिंग पोलीस ठाण्याच्या ठाणेदार म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यांच्या कर्तव्यपरायणतेची ठिणगीच इतकी जबरदस्त की, गुन्हेगारांना त्यांच्या नावानेही झोप उडते!
नव्या जबाबदारीनंतर आता मानोरा ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेला बळ मिळणार हे स्पष्टच. पोहेकर यांनी आपल्या कारकिर्दीत चिडीमार विरोधी पथकात काम करत असताना महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आक्रमक पावले उचलली. त्यामुळेच त्यांना ‘लेडी सिंघम’ ही उपाधी लाभली.
गावखेड्यातील महिला, मुली आणि सामान्य जनतेसाठी त्या आश्वासक चेहरा ठरल्या आहेत. महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कार्यवाही करणे हेच त्यांचे धोरण. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, बैठका, महिला सक्षमीकरण मोहिमा आणि जनजागृती यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.