महाराष्ट्रसामाजिक

मालगाव सुभाषनगर कोट्यवधींच्या कामांनी उजळणार

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | मालगाव येथील सुभाषनगर भागातील विकासकामांना अखेर गती मिळाली असून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत ‘अ’ गट संत रोहिदास मार्ग येथील दहा लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. आमदार सुरेश भाऊ खाडे व आमदार ईद्रीस नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून सुभाषनगर परिसरातील विविध विकासकामांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या शिफारशीनुसार सुभाषनगर दलित वस्तीच्या विकासासाठी वीस लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच आमदार इद्रीस नायकवडी यांच्या स्थानिक विकास निधीतून चिंतामणी कॉलनी येथे सभामंडपासाठी १७ लाख रुपये, जाधव घर ते बेळगावी घर रस्ता कामासाठी १० लाख रुपये, लिंगायत समाज स्मशानभूमीसाठी १० लाख रुपये, सार्वजनिक स्मशानभूमीसाठी ५ लाख रुपये आणि अन्य सार्वजनिक सुविधांसाठी ५ लाख रुपये अशी विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व कामांमुळे सुभाषनगर परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.

सदर विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच तुषार खांडेकर, नरेंद्र परदेशी, जावेद मुल्ला, सुलेमान मुजावर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रखडलेली कामे मार्गी लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः सुभाषनगर परिसरातील महिला वर्गामध्ये या विकासकामांबाबत समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून सुभाषनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. सदर योजनेला विद्युत कनेक्शन जोडण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत योजना तातडीने कार्यान्वित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी माजी सभापती पंचायत समिती काकासाहेब अण्णा धामणे, पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर, मालगावच्या सरपंच अनिता ताई क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य कीर्ती परदेशी, ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला, सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे संचालक सुलेमान मुजावर, रवींद्र क्षीरसागर, नरेंद्र परदेशी, अजित खोत, उदय वनकुंद्रे, सुभाष माने, लोंढे मॅडम, माने मॅडम तसेच मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी सांगितले की, आमदार सुरेश भाऊ खाडे व आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे काकासाहेब अण्णा धामणे व महादेव दादा दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून येत्या काळात सुभाषनगर भागाचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही