मिरजच्या गुंडगिरीला पोलिसांचा चाप ; गांजा विकणारा हुसेन बादशहा सय्यद सांगलीतून तडीपार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज शहरात अवैधरित्या गांजा विक्री करून परिसरात दहशत माजवणारा सराईत गुंड हुसेन बादशाह सय्यद (वय २७, रा. कैकाडी गल्ली, हिंदू धर्मशाळेमागे, मिरज) याला पोलिसांनी मोठी कारवाई करत अखेर सांगली जिल्ह्यातून तब्बल एक वर्षाकरिता तडीपार केले आहे.
“नशामुक्त भारत अभियान”च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात गांजा, गुटखा, पानमसाला यांसारख्या नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत हुसेन सय्यद याला जाळ्यात ओढण्यात पोलिसांना यश आले.
हुसेन सय्यदवर गांजाविक्रीसह अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर अनेक वेळा अटक, जामीन, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याने आपली गुन्हेगारी सवय सोडली नाही. उलट जामीनावर सुटताच नवीन गुन्हे करत शहरात दहशत माजवली. यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यास देखील घाबरत होते.
या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्था.गु.अ. शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हेगारावर “तडीपार” प्रस्ताव तयार करून पुढे सादर केला.
यानंतर मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज विभाग यांनी सुनावणी करून १२ सप्टेंबर रोजी हुसेन बादशाह सय्यद याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सोडण्यात आले.
पुढील टप्प्यात कडक कारवाई
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले की, आगामी सण-उत्सव तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील त्रासदायक व धोकादायक इसमांविरोधात तडीपार, एमपीडीए व मोका यांसारखी कारवाई करण्यात येणार आहे. गांजा, गुटखा, पानमसाला आणि नशेच्या साहित्याची अवैध विक्री करणाऱ्यांचा समूळ बीमोड करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.