मिरजमधील दहशतखोर गुंड सोहेल सुभेदार एक वर्षासाठी तडीपार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज शहर व परिसरात घातक हत्यारे बाळगून नागरिकांना गंभीर दुखापत करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार सोहेल ऊर्फ शाबाज बादशाह सुभेदार (वय २४) यास सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई मा. संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली), मा. श्रीमती कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक, सांगली), मा. प्रणिल गिल्डा (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग) व मा. संजीवकुमार झाडे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आरोपी सोहेल ऊर्फ शाबाज सुभेदार, रा. ख्रिश्चन दफनभूमी जवळ, ईदगाह नगर झोपडपट्टी, माजी सैनिक वसाहत जवळ, मिरज याच्याविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल होते. अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. जामिनावर सुटल्यानंतरही तो पुन्हा गुन्हे करीत असल्याने नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता.
त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक तक्रार देण्यासही धजावत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, मिरज विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला. सुनावणीनंतर आरोपीस सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला. त्यानुसार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी आरोपीस ताब्यात घेऊन सांगली जिल्ह्याबाहेर कर्नाटक राज्यातील कागवाड येथे सोडण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील व धोकादायक गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोका यांसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले आहे.