मिरज पंचायत समितीत सत्तांतर ; काँग्रेस-शिंदे गटाची बाजी, भाजपला धक्का
सभापतीपदी तन्वी कमलेकर, उपसभापतीपदी ललिता शेजुळ ; ११ विरुद्ध १० मतांनी भाजपचा पराभव

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत राजकीय रंगतदार घडामोडी घडत काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी बाजी मारत भाजपला मोठा धक्का दिला आहे. चुरशीच्या या निवडणुकीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी तर शिवसेना (शिंदे गट) च्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. दोन्ही पदांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानात कमलेकर यांनी ११ मते मिळवत विजय मिळवला, तर राणी भोरे यांना १० मते मिळाली. एका मताच्या फरकाने झालेल्या या निकालामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीतही तसाच थरार पाहायला मिळाला. शिवसेना (शिंदे गट) च्या ललिता शेजुळ यांनी भाजपचे पांडुरंग पाटील यांचा ११ विरुद्ध १० मतांनी पराभव करत उपसभापती पद पटकावले. या निकालामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मतदानाच्या वेळी शिवसेना (शिंदे गट) चे सदस्य पांडुरंग इंगळे अनुपस्थित राहिल्याची नोंद झाली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मतदानाचे समीकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले होते. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शिवसेना (शिंदे गट) ची भूमिका. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची साथ मिळाल्याने भाजपचे गणित पूर्णपणे कोलमडले. या अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) हा निर्णायक घटक ठरला. त्यांच्या भूमिकेमुळेच सत्ता समीकरण पालटले आणि भाजपला धक्का बसला. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गट ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
या निकालामुळे मिरज पंचायत समितीत आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना (शिंदे गट) हे एकत्र सत्तेत आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भाजपला मिळालेला हा धक्का आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा ठरणार असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तर भाजपच्या गोटात मात्र नाराजीचे वातावरण दिसून आले. मिरज पंचायत समितीतील या सत्तांतरामुळे पुढील काळात स्थानिक राजकारणात नवे वारे वाहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.