मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; विद्यार्थ्यांसह १९ प्रवाशी जखमी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये कवठेमंकाळ शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसह १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस सांगलीकडून जतच्या दिशेने जात असताना एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे.
नागपूर- रत्नागिरी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कवठेमंकाळ बस मधून परत जात असताना तानंग फाटा येथे नांदेड कडून मिरज मार्गे कुपवाड एमआयडीसी कडे जाणाऱ्या ट्रकने भीषण धडक दिली.
बसला धडक दिल्याने बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसह १९ प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान, या जखमी विद्यार्थी तसेच प्रवाशांना लागलीच मिरज शासकीय रुग्णालय येथे तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्यांचे विविध तपासण्या सध्या सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. मात्र या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मिरज ग्रामीण पोलिसांनी बस तसेच ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासण्या करून विद्यार्थ्यांना कवठेमहांकाळकडे रवाना करण्याचे काम करत आहेत.