मिरज संस्थानच्या युवराजांचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न; राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांचे पौत्र युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांचा शुभविवाह गोटे (ता. कराड) येथे दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. हा विवाह सिक्कीमचे माजी राज्यपाल स्व. श्री श्रीनिवास पाटील यांची पौत्री सौ. का. अनुसया सारंग पाटील यांच्यासोबत संपन्न झाला.
या शाही विवाह सोहळ्यास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, नामवंत राजकीय नेते, आजी-माजी मंत्री, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नववधू-वरांना शुभेच्छा व आशीर्वाद देत त्यांच्या भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.
विवाहानंतर नववधू-वरांचे मिरज येथे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरज किल्ला बागेतील श्री माधवजी देवालय येथे आगमन झाल्यानंतर श्री गणेश तलाव येथील गणपती मंदिरापर्यंत भव्य वरात काढण्यात आली. पारंपरिक सांस्कृतिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या वरातीने संपूर्ण मिरज शहर उत्सवमय झाले होते. ढोल-ताशे, शहनाई, पारंपरिक वेशभूषा आणि शाही थाट यामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मिरज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहिले होते. नागरिकांनी पुष्पवृष्टी करत, जल्लोष करत नवदाम्पत्याचे स्वागत केले. मिरज संस्थानच्या परंपरेला साजेसा असा हा विवाह सोहळा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात विशेष चर्चेचा विषय ठरला असून सर्वत्र या शाही विवाहाचे कौतुक होत आहे.