महाराष्ट्र

मिरज-सोलापूर मार्गावर डंपरखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज–सोलापूर महामार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात नंदनी मच्छिंद्र दोलतडे (वय 32) यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज कृष्णदेव दोलतडे (वय 32) आणि त्यांची वाहिनी नंदनी दोघेही मोटारसायकल क्रमांक MH 10 CJ 4229 वरून मिरजकडून सोलापूरच्या दिशेने मुलगी पाहण्यासाठी जात होते. मात्र, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर पोहोचताच त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या मोठ्या डंपरने जोरदार धडक दिली.

अचानक झालेल्या या अपघातात मोटारसायकलचे संतुलन पूर्णपणे बिघडले आणि नंदनी दोलतडे थेट डंपरच्या पाठीमागील चाकाखाली गेल्या. चाकाखाली सापडताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले परंतू, अपघात अत्यंत भीषण असल्याने त्यांना मदत करण्याची संधीही मिळाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून डंपरचालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अचानकपणे घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबातील सदस्य मुलगी पाहण्याच्या आनंदात घराबाहेर पडले असताना झालेल्या या अपघाताने दोलतडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही