
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शेतजमिनीची हिस्सेवाटणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मृत्यू दाखल्यासाठी चक्क दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डोंगरकिन्ही ग्रामपंचायतीच्या परिचराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी कागदपत्रासाठी नागरिकांना लाच द्यावी लागते, या प्रकारामुळे ग्रामपंचायत व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव राजेश बळीराम बाविस्कर (वय ५४, रा. डोंगरकिन्ही, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे असून तो ग्रामपंचायत डोंगरकिन्ही येथे शिपाई/परिचर म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराच्या आईचे निधन झाले असून शेतजमिनीची हिस्सेवाटणी करण्यासाठी त्यांना मृत्यू दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला असता आरोपी बाविस्कर याने “दाखला मीच तयार करून देतो, पण त्यासाठी २५०० रुपये द्यावे लागतील; पैसे दिले नाहीत तर दाखला मिळणार नाही,” अशी उघडपणे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ACB च्या पथकाने ११ मार्च २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी कारवाई केली. त्यावेळी आरोपीने मृत्यू दाखला देण्यासाठी २५०० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ACB ने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार आरोपीकडे गेला असता बाविस्कर याने तडजोड करून २००० रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम त्याने आपल्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवताच तक्रारदाराने दिलेल्या इशाऱ्यावरून ACB च्या पथकाने धडक देत त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशातून लाचेची २००० रुपयांची रक्कम तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून पंचनामा प्रक्रिया करण्यात आली. यानंतर आरोपीच्या घराचीही झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्याची तयारी ठेवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सदर कारवाई बापू बांगर (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र) व सचिंद्र शिंदे (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच जगदीश परदेशी (पोलीस उपअधीक्षक), पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड, पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, पोहवा विनोद मारकंडे, योगेश खोटे, पो.शि. महेश परमेश्वरे, चापोशि. नाविद शेख आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
सरकारी कार्यालयात साधा मृत्यू दाखला मिळवण्यासाठीही नागरिकांना लाच मागितली जात असल्याचा हा प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून ग्रामपंचायत कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.