मोटारसायकल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; चार दुचाकी जप्त

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या कारवाईत दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या मालिकेला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमला गुप्त माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीत सहभागी असलेला एक संशयित इसम ग्राम तोंडगाव येथे आला आहे. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर व पथकाने तात्काळ तोंडगावकडे धाव घेतली.
पोलीस पथक गावात दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी शेतशिवारात पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदर्श जीवन कांबळे (रा. तोंडगाव, ता. जि. वाशिम) असे आहे. त्याच्याकडून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतून होंडा कंपनीची ‘युनिकॉर्न’ मोटारसायकल आपल्या साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्या कबुलीजबाबावरून दुसरा आरोपी श्रेयस गणेश पाचपिल्ले (रा. खामगाव जिन, ता. जि. वाशिम) याचा शोध घेण्यात आला. तो काटा रोड परिसरातून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना एकत्रित चौकशीअंती त्यांनी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर, रिठद तसेच हिंगोली जिल्ह्यातील माळशेलू येथून मोटारसायकली चोरी केल्याचे उघड केले.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या असून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक मोटारसायकलही जप्त केली आहे. अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना पुढील तपासासाठी शिरपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या टोळीने जिल्ह्यात आणखी काही दुचाकी चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून तपासादरम्यान अधिक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.