मोहगव्हाण येथे हातभट्टी दारूवर छापा, लाखोंचा मुद्देमाल नष्ट

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवायांचे सत्र सुरू केले असून ग्राम मोहगव्हाण येथे हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी जुगार व अवैध दारूविरोधात कारवाई करत मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अवैध दारू, जुगार, गुटखा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे करणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम मोहगव्हाण येथील धरण परिसरात काही जण गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दिनांक ११ मार्च २०२६ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहगव्हाण येथे धडक कारवाई करण्यासाठी रवाना होत धरण परिसराला वेढा घातला. पोलिसांच्या हालचालीची चाहूल लागताच हातभट्टी दारू तयार करणारे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता झाडाझुडपात लपवून ठेवलेले तसेच जमिनीत खड्डे करून पुरून ठेवलेले दारू बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.
पोलिसांना घटनास्थळी सडवा मोहामाचाचे २० ड्रम, ४ प्लास्टिक टाक्या आणि २० पिंपे असा सुमारे ४,७०० लिटर मोहामाच सडवा मिळून आला. त्यापासून तयार होणाऱ्या गावठी हातभट्टी दारूची अंदाजे किंमत सुमारे ७ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर सर्व साहित्य पंचासमक्ष नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी फरार आरोपी जमिल रहेमान नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण हद्दीत प्रमोद गंगाराम चव्हाण याच्या ठिकाणी छापा टाकून त्याच्याकडून देशी व विदेशी दारूचा ७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय वाशिम शहर व कारंजा शहर पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईत १० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अवैध दारू व जुगारविरोधातील या कारवायांमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सदर सर्व कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि शेखर मास्कर, बुद्धू रेघीवाले तसेच स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने संयुक्तपणे केली.