महाराष्ट्रराजकीय

म्हैसाळवर तुतारीचा ताबा ; विचारांच्या लढाईत धनशक्तीचा पराभव

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये म्हैसाळ–टाकळी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने निर्णायक घाव घालत दणदणीत विजय नोंदवला आहे. म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या पत्नी सौ. वर्षा सचिन कांबळे यांनी तब्बल १३९३ मतांच्या भरगोस फरकाने विजय मिळवत ‘तुतारी’चा आवाज संपूर्ण गटात घुमवला आहे. त्याचबरोबर म्हैसाळ पंचायत समिती गणातून गायत्री घोरपडे यांनी ६४० मतांनी विजय मिळवला असून टाकळी पंचायत समिती गणातून सौ. रिदा सुलेमान मुजावर यांनीही भरघोस मतांनी बाजी मारली आहे.

ही निवडणूक केवळ आकड्यांची नव्हे, तर विचारांची, संघर्षाची आणि धनशक्तीविरोधातील लढाई ठरली. पैशांच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला मतदारांनी ठाम नकार दिला आणि विकास, प्रामाणिकपणा व लोकशाही मूल्यांना कौल दिला. म्हैसाळ गटातील मतदारांनी एकसंघ होत ‘तुतारी’च्या बाजूने मतदान करत निकालातून स्पष्ट संदेश दिला आहे.

सौ. वर्षा कांबळे यांचा विजय हा केवळ वैयक्तिक नसून तो कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचा, महिलांच्या विश्वासाचा आणि सर्वसामान्य मतदारांच्या जागृतीचा विजय आहे. घराघरांत पोहोचलेला संपर्क, प्रश्नांची जाण आणि रोखठोक भूमिका यामुळे त्यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली. म्हैसाळ पंचायत समिती गणातील गायत्री घोरपडे आणि टाकळी गणातील रिदा मुजावर यांच्या विजयाने राष्ट्रवादी शरद पवार गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे.

या ऐतिहासिक विजयाबद्दल म्हैसाळ गटातील सर्व मतदार बंधू–भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या लढाईत साथ देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे आणि विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचे ऋण मान्य करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय मनोज शिंदे तसेच मार्गदर्शक व कार्यकर्त्यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे हा विजय शक्य झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सचिन कांबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाच्या दिवशी दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे. २०१७ मध्ये हातातून निसटलेला म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समित्या पुन्हा पक्षाच्या ताब्यात आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. तो शब्द आज कार्यकर्त्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांना दिलेल्या विजयातून साकार केला आहे.

या यशात पत्रकार बांधवांचेही मोठे योगदान असून प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानण्यात आले. तसेच शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

म्हैसाळ–टाकळीतील हा निकाल म्हणजे विचारांचा विजय, संघर्षाची पावती आणि धनशक्तीला दिलेला करारा धक्का आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही