
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध जनावर वाहतुकीवर मोठा हातोडा मारत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत 27 म्हैस वर्गीय जनावरे निर्दयीपणे कोंबून नेत असताना पोलिसांनी ट्रक पकडला. सुमारे 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर अवैध जनावर वाहतुकीवर आळा घालण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर 8 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, एमएच-20 जीएस 2392 हा ट्रक जनावरांनी भरून मंगरुळपीर परिसरातून जात आहे.
त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थरारक पाठलाग करत वाहन अडवले. तपासात मुद्दसिर खान अतीक खान (23) आणि तैमुर खान (32) हे दोघे आरोपी आढळले. ट्रकमध्ये 27 म्हैस वर्गीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवली होती. ना चाऱ्याची व्यवस्था, ना पाण्याची! त्या दृश्याने पोलिसही स्तब्ध झाले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि ट्रकसह जनावरे जप्त केली. अंदाजे 26 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद मंगरुळपीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि. शेखर मास्कर, पो.ह.वा. दीपक सोनुने, पो.ह.वा. राहुल व्यवहारे, पो.अं. राजकुमार यादव आणि भूषण ठाकरे यांनी केली.