महाराष्ट्रसामाजिक

रस्ता रुंदीकरण ; पण श्रद्धास्थान सुरक्षित ; लिंगनूरकरांचा निर्धार, पिंपळवृक्षांचा सन्मान कायम अपार

LiVE NEWS | UPDATE

प्रतिनिधी | सागर गुरव

मिरज | सरकारच्या हम प्रोजेक्ट योजनेतून ग्रामीण भागातील रस्ते रुंदीकरणाची कामे जोमात सुरू आहे. मिरज-बेडग-अरग-लिंगनूर-बेळंकी या प्रमुख मार्गावरील रुंदीकरणाचे काम झपाट्याने पुढे जात असतानाच, लिंगनूरमधील बौद्ध विहारासमोरील दोन पिंपळवृक्षांवर संकटाचे ढग घोंघावत असल्याचे समजताच गावकरी पेटले आहेत.

समाजातील ज्येष्ठ बांधवांनी दशकांपूर्वी रोवलेली ही दोन पिंपळाची झाडे केवळ हिरवाईचे प्रतीक नाहीत, तर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जिवंत वारसा आहेत. बोधीवृक्ष हा जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धास्थान आहे. महाकरुणी तथागत बुद्धांनी अशा पिंपळवृक्षाखाली सहा वर्ष तपश्चर्या करून ज्ञानप्राप्ती साधली, त्या पवित्र परंपरेशी लिंगनूरची ही झाडे थेट जोडली गेली आहेत. त्यामुळे रस्ता झाला तरी होवो, पिंपळवृक्षाला कुणी धक्का लावणार नाही. असा इशारा समाजाने ठणकावून दिला.

झाडे तोडली जाणार असल्याचे वृत्त समजताच गावकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. क्षणाचाही विलंब न करता समाजबांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. श्रद्धास्थानावर कुऱ्हाड चालवू देणार नाही या भावनेने लोकप्रतिनिधींनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच दादासाहेब मगदूम, माजी सरपंच पिंटू पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नंदकुमार नलवडे यांच्यासह समाजातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. ही झाडे आमच्यासाठी फक्त पान-फांदी नाहीत, तर आस्थेचे प्रतीक आहेत. आवश्यक असेल तर मोठा लढाही देऊ, पण पिंपळ वाचवू, असा ठणकावता इशारा देण्यात आला.

समाजाची एकजूट पाहून गावातील प्रमुख मान्यवरांनी ठाम भूमिका घेतली. रस्ता रुंदीकरण होईल, पण पिंपळवृक्षांचे संवर्धन अबाधित राहील, अशी हमी दिली. सह्याद्रीचे सर्वेसर्वा चंद्रकांत नलवडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, झाडांना कुठलीही इजा होणार नाही. श्रद्धास्थान अबाधित ठेवणे ही आपली पहिली जबाबदारी आहे.

समाजबांधवांच्या सजगतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या समाजाने पूर्वजांची परंपरा आणि बौद्ध विचारधारेचा वारसा जिवंत ठेवला, त्याच समाजाने पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवून दिली आहे.

आज राजकारणाच्या नावाखाली गावोगावी दरी पडताना दिसते; पण लिंगनूरकरांनी पिंपळवृक्षांच्या रक्षणासाठी आपली मने, मते आणि मने एकत्र केली. हीच खरी ताकद आहे. प्रशासनाने जरी कामे कागदोपत्री मांडली असली, तरी लोकांच्या भावनेला धक्का लावण्याची हिम्मत कोणाचीच नाही.

रस्ता रुंदीकरणाच्या कामातून विकास साधला जाईल, पण संस्कृतीची मुळे असलेली पिंपळाची झाडे वाचवूनच हा विकास घडावा, अशी ठाम भूमिका घेतल्याने लिंगनूरचा हा निर्णय आदर्शवत ठरत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही