राॅयल्टी की लफडी? ; मुरुम चोरीत ठेकेदार, ग्रामपंचायत गोंधळी
नांदखेडा मुरुम चोरी प्रकरण ; ‘राजा-राणी" चे पास, बनावट की खरे?

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यात नांदखेडा परिसरात पुन्हा एकदा अवैध गौणखनिज तस्करीचा भस्मासुर डोईजड झाला आहे. राखीव जंगल फोडून मुरुम चोरला गेला, तो थेट शाळेच्या क्रिडांगणावर पोहोचला आणि नंतर सगळे “कायद्याच्या चौकटीत” बसविण्याचे सरकारी डावपेच सुरु झाले. पण हा मुरुम खरोखर परवानाधारक खदानीतूनच आला का, की खोट्या रॉयल्टीच्या ‘कागदी लफ्फाजीतून’ शासनाला चुना लावला गेला? याचा तिढा आजही सुटलेला नाही.

वनविभागाच्या कारंजा परिक्षेत्रातील राखीव जंगलात (खंड क्र. सि-171) दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी चोरीला गेलेला मुरुम पंचनाम्यात नोंदवला गेला. प्राथमिक गुन्हा क्रमांक 07519/187966 दाखल झाला. पण तपासाची दिशा सरळ शाळेच्या मैदानाकडे वळली. कारण, जिल्हा परिषद शाळा नांदखेडा येथे सुरु असलेल्या क्रिडांगण कामात हाच चोरीचा मुरुम वापरण्यात आल्याचे संशयाचे सावट गडद आहे.
गावातील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील हे काम ई-टेंडरद्वारे शासकीय कंत्राटदार श्री. माणकेश्वर रामकिसन बोरकर यांना देण्यात आले. अधिकृत कागदोपत्री उत्तरामध्ये त्यांनी मुरुम कारंजा तालुक्यातील खानापुर खदानीतून आणल्याचे दाखले दिले. त्यासाठी रॉयल्टी पासेस सादर करण्यात आले. वरकरणी सर्व काही कायदेशीर, पण पुढे काय झाले?तक्रारकर्त्यांनी ठोस फोटोसह पुरावे दाखवले की, मुरुम शाळेच्या मैदानावर आधीच पडून होता. म्हणजे ‘रॉयल्टीच्या तारखा’ आणि मैदानावरील मुरुमाच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये फारकत आहे. सरळसरळ हे लफडे उघडे पडले आहे.

आता प्रश्न असा आहे की, हे रॉयल्टी पास खरे आहेत की बनावट? हा खेळ बनावट पासांनी शासनाची फसवणूक करून, जंगलाचे अवैध उत्खनन लपविण्याचा डाव तर नाही ना? कारण, सरकारी कामांमध्ये अशी फोटोशॉप रॉयल्टी आधीपासूनच सर्वज्ञात’ फॉर्म्युला आहे.
मुख्याध्यापकांनी स्पष्ट कबुली दिली आहे की, आमच्याकडे मुरुम कुठून आला, कोणत्या वाहनातून आला, याचे कागदपत्र उपलब्ध नाही. मग थेट प्रश्न असा की, शाळेच्या मैदानात आलेला हा मुरुम कोण घेवून आला? ठेकेदार, ग्रामपंचायत की सरपंचांचे खास ‘खेळाडू’? हे नेमकं सांगता येणार नाही.

या प्रकरणावर आता सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत. वनविभागाने देखील प्रकरण गंभीरतेने घेतले असून दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी चौकशी सुरु केली आहे. पण याच वेळी जनतेचा रोष एकाच दिशेने आहे. वनविभागाने हे ‘पासांचे खेळ’ तपासावे आणि ज्यांनी शासनाच्या डोळ्यांत धूळफेक केली त्यांना कठोर शिक्षा द्यावी.
आज ग्रामीण भागातील शाळेला खेळाचे मैदान मिळावे ही सरकारची योजना. पण त्या योजनांच्या नावाखालीच अवैध खाणींचा रस्ता उघडला जातो, जंगलं उध्वस्त होतात आणि बनावट कागदोपत्री व्यवहारातून खिसे फुगवले जातात. शाळेच्या मुलांच्या मैदानाचा मुरुम चोरून नेणारे हे ठेकेदार-ग्रामसेवक-सरपंच यांचे त्रिकोणी गाठोडे आता उघडे पडण्याची वेळ आली आहे.
नांदखेड्याचा मुरुम हा आता फक्त गौणखनिज राहिलेला नाही, तर शासनाच्या यंत्रणेवरचं मोठं ‘गंभीर प्रश्नचिन्ह’ बनला आहे.