क्राईमविदर्भ

रिसोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; सशस्त्र आंतरजिल्हा टोळी गजाआड, तीन गुन्हे उघड

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

पोलीस स्टेशन रिसोडच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत सशस्त्र आंतरजिल्हा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, तीन गुन्हे उघडकीस आणत एकूण सुमारे ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी दत्ता नामदेव उगले (वय ५०, रा. बिबखेडा शेतशिवार, मोठेगाव, ता. रिसोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबरच्या रात्री ते कुटुंबासह शेतातील घरात झोपले असताना तीन अज्ञात आरोपींनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत आई व पत्नीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी विकास विश्राम जायभाये (रा. चाकोली, ता. रिसोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार अज्ञात आरोपींनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या कुटुंबीयांचे दागिने लुटले. याच आरोपींनी शेजारील आसाराम पोटे यांच्या घरातूनही दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा २८ हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता.

या गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकाला विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, एक मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, एक जिवंत काडतूस, स्टीलचा खंजीर तसेच एक पल्सर मोटारसायकल असा एकूण सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून तपास प्रगतीपथावर आहे.

याशिवाय २९ मार्च २०२६ रोजी सतिश दत्तराव ठोकरे (रा. रिसोड) यांच्या किराणा दुकानातून १५ लिटरचे तीन कॅन चोरी करणाऱ्या संतोष विठ्ठल शेळके (रा. हिंगोली) याला अवघ्या दोन तासांत अटक करून त्याच्याकडून ७५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही