कलामनोरंजनमहाराष्ट्र

लेंगरेतील हजरत पीर लाल शाहबाज कलंदर उरुसास सुरवात

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विटा प्रतिनिधी | लेंगरे (ता. खानापूर) येथे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत पीर लाल शाहबाज कलंदर बाबांचा उरूस दि. २५ मार्चपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उरूसानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

उरूसाच्या उद्घाटनाच्या रात्री लोकनृत्य, पारंपरिक तमाशा, भेदिक तसेच प्रसिद्ध कव्वाल अजीम नाजा यांचा कव्वाली कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमांसाठी दूरदूरवरून भाविक व रसिक उपस्थित राहतात. दि. २६ मार्च रोजी पहाटे मानाचा गालफ व संदल विधी प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून या विधींना विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यानंतर दुपारपासून मानाच्या बैलगाडा पळवण्यास सुरुवात होणार आहे.

दि. २७ मार्च रोजी पारंपरिक धार्मिक विधी पार पडतील, तर दि. २८ मार्च रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धांमध्ये विविध भागांतील मल्ल सहभागी होणार असून प्रेक्षकांसाठी हा विशेष आकर्षणाचा भाग ठरणार आहे. दि. २९ मार्च रोजी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून या शर्यतींना मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे.

उरूसाच्या काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा समिती व ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेसाठीही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

लेंगरे येथील हा उरूस केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक या उरूसाला हजेरी लावून बाबा दरबारात नतमस्तक होतात.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही