लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं अभिवादन; स्मारक सुशोभीकरणासाठी आ. इंद्रिस नायकवडींकडे प्रस्ताव सादर करणार ; किरण कांबळे

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधन यांचे अनमोल दैवत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मिरज येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांचेकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत शहरात स्मारक सुशोभीकरणासाठी आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडे लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती मिरज शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे यांनी दिली.
मिरज शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापाशी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. अण्णाभाऊ साठे हे केवळ शाहिरीचे नव्हे तर परिवर्तनवादी विचारांचेही प्रवर्तक होते. दीड दिवस शाळा शिकूनही त्यांनी अनेक कालातीत कादंबऱ्या, कथासंग्रह लिहिले. त्यांच्या शाहिरीतून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले. “जग बदल घालूनी घाव, सांगू गेले मज भिमराव” असे शब्द उच्चारून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानले होते.
कार्यक्रमावेळी मिरज शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे यांनी सांगितले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक अधिक भव्य व देखणे व्हावे, यासाठी लोकप्रिय आमदार इद्रिस भाई नायकवडी यांच्याकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. स्मारकाचे सुशोभीकरण झाले पाहिजे, जेणेकरून नव्या पिढीला त्यांचे कार्य आणि विचार अधिक प्रभावीपणे समजतील.”
या अभिवादन कार्यक्रमाला माजी नगरसेवक अतहर नायकवडी, चंद्रकांत मैगुरे, मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे, मिरज शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे, सांगली जिल्हा शहराध्यक्षा राधिका हारगे, तालुकाध्यक्ष नीता आवटी, मिरज शहराध्यक्षा शितल सोनवणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.