पालघरमध्ये बोगस होमगार्ड भरती ; मयत महिलेच्या बॅचवर दुसऱ्या महिलेची वर्णी

LiVE NEWS | UPDATE
पालघर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
पालघर होमगार्ड खात्यात २०११ च्या कालावधीत भरती झालेली महिला मयत झाली असून त्या महिलेचा सनद क्रमांक (बॅच) वापरून अन्य महिला गेल्या काही वर्षापासून होमगार्ड पदावर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे यांच्या अंतर्गत ऑगस्ट २०११ मध्ये पालघर तालुका होमगार्ड विभागात ५६ महिलांची भरती करण्यात आली होती. या महिलांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर ३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०११ च्या दरम्यान जिल्हा समादेशक यांच्या निदर्शनाखाली पार पडले. पालघर पथकातील मानसी राऊत यांची जुनी भरती २०११ रोजी झाली असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी होमगार्ड ठाणे सुनीता शेलार यांनी माहिती अधिकारात नमूद केले आहे.
पालघर पथकातील मानसी राऊत या बंदोबस्तावर हजर न राहिल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. याबाबत मानसी राऊत यांनी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाला संघटनेत सेवा करण्याची संधी मिळण्याबाबत अर्ज केला होता. या अर्जावर नोंदविण्यात आलेला सनद क्रमांक ६४२ असा होता. मात्र २०११ च्या महिला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराच्या हजेरीपटामध्ये हा क्रमांक नीलम धांगडा या महिलेच्या नावे नोंद असल्याचे आढळले आहे. तसेच नीलम या महिलेचे नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले आहे. त्यामुळे मयत महिलेचा सनद क्रमांकावर अन्य महिला कार्यरत असून या महिलेची २०११ च्या ५६ महिलांच्या प्रशिक्षण शिबिरात कोठेही नोंद नाही.
पालघर पथकातील २०११ चे समादेशक अधिकारी एकनाथ माळी यांची जुलै २०११ रोजी नाशिक येथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांचे काम पालघर पथकातील अंशकालीन लिपिक हिरेंद्र ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. एकनाथ माळी यांच्या राजीनाम्यानंतर २० सप्टेंबर २०१२ रोजी दैनंदिन कामकाज हीरेंद्र ठाकूर यांच्याकडून काढून अंशकालीन लिपीक निलेश राऊत यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आले होते. या दरम्यान मानसी राऊत यांची कोणी व कधी भरती केली याची कुठेही नोंद उपलब्ध झाली नाही.
याबाबत केंद्रनायक अजय गुरव यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मानसी राऊत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मयत महिलेच्या भावाचा आरोप
पालघर होमगार्ड कार्यालयात बोगस भरतीचा प्रकार घडला असून या प्रकरणात ठाणे मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने मयत महिला होमगार्ड कै. नीलम धांगडा यांच्या जागी मानसी राऊत यांना बोगस भरती केले आहे. मानसी राऊत या प्रभारी समादेशक अधिकारी निलेश राऊत यांच्या सख्ख्या वहिनी असून त्यांनी हेतू पुरस्सर बोगस भरती केले असून आम्हा भूमिपुत्रांना होमगार्ड सेवेतून डावलण्यात आले आहे.
राजीनामा दिलेली महिला बंदोबस्तात
मानसी राऊत यांनी कार्यपदाचा एप्रिल मे महिन्या दरम्यान राजीनामा दिला असल्याचे प्रभारी समादेशक अधिकारी यांनी सांगितले आहे. मात्र, असे असताना या महिलेने एप्रिल महिन्यापासून २७ ऑगस्ट गोकुळाष्टमी पर्यंत तब्बल ४३ दिवस पालघर, रायगड, अहमदनगर व तारापूर येथे बंदोबस्त केल्याची नोंद आहे. त्यामुळे समादेशक अधिकारी एकीकडे त्या महिलेने राजीनामा दिला असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे जिल्हा कार्यालयाकडे बंदोबस्ताची नोंद आहे.
2011 च्या भरतीवेळी समादेशक अधिकारी एकनाथ माळी तर अंशकालीन लिपीक हिरेंद्र ठाकूर हे होते. मानसी राउत ही महिला आमच्या कर्मचारी असून त्यांनी एप्रिल-मे महिन्यात कार्यपदाचा राजीनामा दिला आहे. मानसी राऊत यांच्या त्यावेळच्या भरतीच्या कागदपत्रे जुन्या जिल्हा व तालुका कार्यालयात भिजून खराब झाली आहेत. त्यामुळे त्यासंबंधी कोणताही तपशील आमच्याकडे उपलब्ध नाही. तसेच याबाबतची पूर्ण प्रक्रिया मुख्यालयाकडून झाली असून आम्हाला याबद्दल कसलीही माहिती नाही.
निलेश राऊत, प्रभारी समादेशक अधिकारी पालघर होमगार्ड.
निलेश राऊत यांच्या सांगण्यानुसार 3 ऑगस्ट 2011 ची भरती माझ्या कारकीर्दीत झाली असून भरती घेणारे अधिकारी हे शिबिराच्या वेळेत उपस्थित होते. मानसी राऊत व इतर कुठल्याही होमगार्ड कर्मचारी महिला व पुरुष यांना भरती करण्याचा अधिकार हे केंद्रनायक व जिल्हा समादेशककडे असतो. म्हणून मानसी राऊतच्या भरती विषयी मला काही एक माहित नाही व हि महिला माझ्या कारकीर्दीत भरती झालेली नाही.
हिरेंद्र ठाकूर, तत्कालीन अंशकालीन लिपिक.