
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तसेच कलावंत शेखर भगत यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याने जनमानसावर ठसा उमटवला आहे. गरीब आणि गरजूंसाठी काम करताना त्यांनी सदैव लोकहिताचा विचार प्राधान्याने केला. त्यामुळे तालुक्यात नव्या आणि युवा नेतृत्वाची सकारात्मक चर्चा सुरु झाली आहे.
शेखर भगत यांचे बालपण गरिबीत गेले. कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळाला. कलेच्या माध्यमातून समाजकार्यात योगदान देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांनी कविता, नाटक, लेखन या क्षेत्रात कार्य करून अभिनय आणि मिमिक्रीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच, पण त्याच कलेचा वापर समाजहितासाठी केला.
सामाजिक कार्याची दखल घेत गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून सरपंच पदाची जबाबदारी दिली. सरपंच म्हणून काम करताना शेखर भगत यांनी विकासाला प्राधान्य दिले आणि जनतेच्या समस्यांवर ठोसपणे आवाज उठवला. पाणीप्रश्न असो वा अवैध धंद्यांचा विरोध, त्यांनी नेहमीच समाजहितासाठी पुढाकार घेतला.
महाराष्ट्र सामाजिक चळवळींसाठी ओळखले जाते. त्याच परंपरेत गावपातळीवर कार्यरत राहून शेखर भगत यांनी सामाजिक कार्याला नवा आयाम दिला आहे. त्यांच्या धडाडीच्या आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे तालुक्यात त्यांचे नाव प्रेरणादायी नेतृत्व म्हणून घेतले जात आहे.