
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वणी नगरपरिषद निवडणुकीत मतांसाठी पैशांचे उघड उघड वाटप सुरू असताना प्रशासन मात्र ‘मूक-बधिर’ भूमिकेत असल्याचा आरोप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या जाहीर निवेदनात निवडणूक विभाग आणि पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधत, मत विकणाऱ्यांप्रमाणेच मत खरेदी करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील वातावरणात आधीच निवडणुकीची धुगधुगी वाढलेली असताना, भारतीय जनता पक्षाकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकरणाने खळबळ उडालेली असताना निवडणूक विभाग आणि पोलिस प्रशासनाने कारवाईविषयी पूर्ण शांतता पाळली आहे. ‘मुंग गिळून बसलेल्या’ निवडणूक अधिकाऱ्यांना आणि ‘डोळे झाकलेल्या’ पोलिसांना लोकशाहीची जबाबदारीची किमान जाणीव आहे की नाही, असा सवाल इंगळे यांनी उपस्थित केला.
इंगळे म्हणतात, लोकशाही हा आपल्या संविधानाचा कणा आहे. पण पैशांचे राजकारण आणि मतांची उघड खरेदी-विक्री यामुळे ही लोकशाही अशक्त होत चालली आहे. भारतीय जनता पक्षाने पैशांचे वाटप करून लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा प्रकार म्हणजे थेट लोकशाहीचा खूनच आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनावर दबाव अधिकच वाढला आहे.
बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या विशेष प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर या गंभीर प्रकरणाचा निवडणूक आयोगाने तातडीने तपास करून दोषींवर कारवाई केली नाही, तर संघटना रस्त्यावर उतरेल. वणी पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारीही संघटनेने दर्शवली आहे. मत विकणारे चुकीचे आहेतच, पण मत खरेदी करणारे त्याहूनही मोठे गुन्हेगार आहेत. दोघांवरही गुन्हे दाखल होणे अत्यावश्यक आहे, असे इंगळे म्हणाले.
वणी शहरात या मुद्यावर चांगलीच चर्चा रंगली असून सामान्य जनतेचे लक्ष आता निवडणूक विभाग आणि पोलिसांकडे लागले आहे. प्रशासनाने तातडीने पुढाकार घेतला नाही तर मतांसाठी पैशांची विक्री हा प्रकार पुढे आणखी उग्र रूप घेऊ शकतो, अशी भीतीही नागरिक व्यक्त करीत आहेत.
सध्या तरी निवडणुकीच्या मैदानात पैसा, सत्ता आणि बडेजाव यांचे राजकारण खुलेआम सुरू असताना, लोकशाहीचे संरक्षण कोण करणार हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. मतदारांना डोळे झाकून खरेदी करण्याच्या या खेळावर निवडणूक आयोग आणि पोलिस यंत्रणा नेमकी कोणती कारवाई करणार, हे पाहणे आता वणी तालुक्याच्या जनतेला महत्त्वाचे ठरणार आहे.