वारसाला मिळाली ‘वास्तू’ची साथ ; देसाईंची जनतेशी नव्याने गाठ

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
पाटण | महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात “मेघदूत” या शासकीय बंगल्यातून राज्यातील सामान्य जनतेची सेवा केली. त्यांच्या राजकीय जीवनाचा बहुतेक काळ त्यांनी याच वास्तूमधून जनकल्याणासाठी समर्पित केला होता. विशेषतः पाटण तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी हा बंगला आश्वासक ठिकाण ठरला होता. गावाकडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमाने, आत्मीयतेने भेटत, त्यांची विचारपूस करून त्यांच्या समस्या सोडवायचे. त्यामुळे “मेघदूत” हे केवळ निवासस्थान नसून जनतेच्या भावनांचे केंद्र ठरले.
सन २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ना. शंभूराज देसाई हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यानंतर शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि ना. शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. मंत्रीमंडळ स्थापनेनंतर मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले. याच वेळी ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या आजोबांनी कार्यरत असलेल्या “मेघदूत” बंगल्यातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांच्या विनंतीचा सकारात्मक विचार करून त्यांना “मेघदूत” बंगला पुनः मिळाला.
ही केवळ वास्तूतील पुनरागमनाची गोष्ट नव्हे, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या जनसेवेच्या परंपरेची साखळी आहे. याच भावनेने ना. शंभूराज देसाई यांनी “मेघदूत” बंगल्यात विधिवत पूजन केले. पूजनप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई, सौ. वत्सलादेवी देसाई व स्व. शिवाजीराव देसाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
आजोबांच्या विचारांचा वारसा घेऊन ना. शंभूराज देसाई राज्याच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रात ठामपणे उभे आहेत. प्रशासनावर मजबूत पकड, ठाम निर्णयक्षमतेसह सामान्य जनतेसाठी झटण्याची वृत्ती हे त्यांचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. आजोबांप्रमाणेच नातवांनीही लोकाभिमुख राजकारणाचा वसा पुढे चालवला आहे. “मेघदूत” ही वास्तू आज पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या सेवा कार्यासाठी सज्ज झाली आहे.