वाशिम पोलिसांची ठोस कामगिरी ; गावगुंड संतोष ठोकेवर एमपीडीएखाली स्थानबद्धतेची कडक कारवाई

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाशिम शहरातील नालंदा नगर येथे राहणारा सराईत गुन्हेगार संतोष आत्माराम ठोके याच्यावर अखेर महाराष्ट्र प्रतिबंधात्मक धोकादायक व्यक्ती अधिनियम (एमपीडीए) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या निर्देशानुसार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना गुन्हेगारांविरोधात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले होते. त्याचाच भाग म्हणून ठोकेवर ही मोठी कारवाई झाली आहे.
संतोष ठोके याच्यावर वाशिम व अकोला जिल्ह्यांत प्राणघातक हल्ले, खंडणी, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वीही वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. अलिकडेच कारागृहातून सुटल्यावर त्याने पुन्हा दोन गंभीर दुखापतीचे गुन्हे केले असून, त्यामुळे त्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर ठोकेविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधविषयक गुन्हेगार, वाळू तस्कर व व्हिडिओ पायरेसीसारख्या समाजविघातक प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या अधिनियम १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) मधील कलम ३(१) अंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने तयार झालेला हा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी १० जुलै २०२५ रोजी ठोके यास पुढील एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानंतर संतोष ठोके याला वाशिम जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ठोकेवर सन २०२१ मध्येही ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे तो जवळपास पाच वर्षे कारागृहातच होता.
वाशिम जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगार व आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीए, तडीपारसारखी कडक कारवाई करुन गुन्हेगारीला रोखण्याचे धोरण जिल्हा पोलीस प्रशासनाने अवलंबले आहे.
या यशस्वी कारवाईत मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सपोनि जगदीश बांगर, आढोळे, अंमलदार विजय नागरे, विनोद सुर्वे, संतोष वाघ, गोपाल चौधरी, कु-हाडे यांचा मोलाचा सहभाग होता.
ही कारवाई जिल्ह्यातील इतर गुन्हेगारांसाठी इशारा ठरणार असून, पोलिसांनी यापुढेही अशाच प्रकारच्या प्रभावी कारवाया करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.