वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सराईत दुकानफोड्या आरोपीला अटक, दोन गुन्हे उघड

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सराईत दुकानफोड्या आरोपीला अटक करण्यात आली असून दोन दुकानफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनुज तारे, पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम चे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी पथकाला तपासाचे निर्देश दिले.
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील ‘मातोश्री झेरॉक्स’ दुकान अज्ञात चोरट्याने फोडून काउंटरमधील ९,५०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे गुन्हा क्रमांक २२३/२०२६, कलम ३०५(अ), ३३४(१) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच दि. २० फेब्रुवारीच्या रात्री सोनखास रोड, लाखाळा येथील ‘माउली किराणा’ दुकान फोडून सुमारे ५०,००० रुपये रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक २५४/२०२६ नोंद करण्यात आला होता.
दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान सदर गुन्हे संजय बबन खाडे (वय ३०, रा. करंजी, ता. मालेगाव, जि. वाशिम) याने केल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपी हा फिरस्ती प्रवृत्तीचा असून निश्चित वास्तव्य नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. मात्र अथक प्रयत्नांनंतर पथकाने दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करून जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि योगेश धोत्रे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर व सुनिल तायडे यांनी तपासात सहभाग घेतला.