क्राईमगुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

विकासाच्या नावाखाली लाचखोरीचा बाजार ; सरपंच व पती गजाआड

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सरपंच वच्छला खुळे व त्यांचे पती बबन खुळे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून शेतातील विहिरीच्या बांधकामासाठी ₹1,41,308/- चा चेक मंजूर झाला होता. मंजूर रक्कमेपैकी अंतिम देयकासाठी चेकवर सही करण्याच्या बदल्यात सरपंच व त्यांच्या पतींनी ₹5000 लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने पडताळणी केली असता लाच मागणी खरी असल्याचे उघड झाले. त्यानुसार मंगळवार, दि. 9 सप्टेंबर रोजी मालेगाव येथील जय गजानन उपहारगृहात सापळा रचून दोघांना पंचासमक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी वच्छला बबन खुळे (वय 52), सरपंच रिधोरा, तसेच त्यांचे पती बबन सिताराम खुळे (वय 60, रा. रिधोरा) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7A व 12 अन्वये मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई यशस्वी करण्यासाठी तपास अधिकारी अलका गायकवाड, पोलीस निरीक्षक, एसीबी वाशिम, पर्यवेक्षण अधिकारी जगदीश परदेशी, उपअधीक्षक, एसीबी वाशिम यांच्यासह नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे, राहुल व्यवहारे, योगेश खोटे, विनोद अवगळे, रविंद्र घरत व नाविद शेख या पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

या धडक कारवाईनंतर तालुक्यात चर्चांना उधाण आले असून ग्रामपंचायत पातळीवरील भ्रष्टाचाराचे पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही