महाराष्ट्र

बेळंकी ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा आरोप ; चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | बेळंकी ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त तसेच सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन या अनियमिततेचा तपास करावा, अशी मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोग, ग्रामनिधी तसेच विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्मशानभूमीतील गटार बांधकाम, बांधकाम परवान्यांची बोगस मंजुरी, तसेच टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव या सर्व बाबींमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करून जनसुविधा व नागरी विकासकामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या संदर्भात तानाजी जाधव, रवींद्र गायकवाड, विजयकुमार गायकवाड, संजय माने आणि संजू दादा गायकवाड यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. त्यांनी ग्रामपंचायत सरपंचावर ग्रामपंचायत नियम ३९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात तात्काळ चौकशी न झाल्यास येत्या सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही