महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांकडून डिजिटल शिक्षणाला हातभार

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

सिध्देवाडीच्या जिल्हा परिषद शाळेने सर्वच स्तरावर झेप घेतली आहे. आतापर्यंत शाळेच्या प्रगतीत शासन, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे मोठे योगदान राहिले आहे. सध्या विद्यार्थीही वाढदिवसानिमित्त मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यांच्यात जागृत होणारे मुक्त शिक्षण कौतुकास्पद आहे.
रवी खताळ, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सिध्देवाडी

मालगांव सिध्देवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करण्याची आगळी-वेगळी परंपरा निर्माण करत शाळेचा ऋणानुबंध जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. अनाठायी खर्चाला फाटा देत शाळेसाठी आवश्यक वस्तू देण्याची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे.

याच उपक्रमांतर्गत विद्यार्थी वेदांत शेळके व आदर्श वाघमोडे यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला डिजिटल शिक्षणासाठी प्रोजेक्टर देण्याचा मानस व्यक्त केला. ही कल्पना त्यांनी आपले वडील आदर्श शिक्षक अमोल शेळके व उद्योजक बापू वाघमोडे यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांची भावना ओळखून दोन्ही पालकांनी प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. एकूण ३० हजार रुपयांत प्रोजेक्टर खरेदी केला जाणार असून त्यामुळे शाळेत डिजिटल शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे.

सिध्देवाडी येथील ही जिल्हा परिषद शाळा शैक्षणिक गुणवत्तेमुळे विभागीय स्तरावर पहिली आली आहे. शासन, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शाळेने प्रगतीची झेप घेतली आहे. इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे वर्ग सुरू करून पश्चिम महाराष्ट्रात शाळेने आपला लौकिक निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे, शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस केवळ केक-कँडलपुरते मर्यादित राहत नाहीत. प्रत्येक विद्यार्थी वाढदिवसानिमित्त शाळेसाठी आवश्यक वस्तू शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य किंवा अन्य गरजेच्या वस्तू भेट देतो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकी व जबाबदारीची भावना दृढ होत आहे.

आतापर्यंत अनेक पालकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे. त्यामुळे शाळेतील सुविधा अधिक सक्षम होत आहेत. विद्यार्थ्यांकडून शाळेचा ऋणानुबंध जपण्याचा हा प्रयत्न इतर शाळांसाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही