वृद्धाला हातचलाखी करून गंडा ; ४९ हजार ९०० रुपयांची रक्कम काढून अज्ञात चोरट्यांचे पलायन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
गणपती मंदिर जवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाला हातचलाखी करून एटीएम आणि पासवर्डची अदलाबदल करून गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. वृद्धांच्या बँक खात्यातील ४९ हजार ९०० रुपयांची रक्कम काढून अज्ञात चोरट्याने पलायन केले. सदर फसवणुकीची घटना हि शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी माणिक पांडुरंग कसबे (वय ६५ रा. मणेराजुरी) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, माणिक कसबे हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावामध्ये राहतात. शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी कसबे हे कामानिमित्त सांगली मध्ये आले होते. शहरातील गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी ३५ ते ४० वयोगटातील एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्याने कसबे यांना पैसे काढून देतो असे सांगून त्यांचे एटीएम कार्ड मशीन मध्ये घातले. कसबे यांना मोबाईल नंबर टाईप करण्यास सांगितला. यावेळी हातचलाखीने एटीएम कार्डचा पिन बदलून नवीन पिन जनरेट करून एटीएम कार्डची अदलाबदल केली. कसबे एटीएम सेंटर मधून बाहेर पडल्यानंतर संशयित तरुणाने पुन्हा त्यांच्या खात्यावरून ४९ हजार ९०० रुपयांची रक्कम काढून पलायन केले. कसबे यांना बँक खात्यातून रक्कम निघाल्याचा मॅसेज आल्यानंतर सदर फसवणुकीची घटना निदर्शनास आली.