वेतन एक तारखेला तर पदोन्नती तात्काळ करा – अमोल माने

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
प्राथमिक शिक्षकांचे मासिक पगार नेहमीच विलंबाने होतात. वेळेवर न होणाऱ्या पगाराची चर्चा पूर्ण राज्यभर असून प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनीही याची दखल घेत पगार वेळेवर करा, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. अशावेळी सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार हा इतर जिल्हयांच्या मानाने अधिकच विलंबाने झाल्याने शासन परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षकांचा पगार हा एक तारखेला करणे बंधनकारक असून तशी कार्यवाही करा, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांच्या पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबवा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे यांच्यासह शिक्षक संघाच्या शिष्ट मंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे केली. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नावर जिल्हा परिषद सांगली येथील शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची शिक्षणाधिकारी यांच्याबरोबर नुकतीच नियोजित बैठक संपन्न झाली.
सांगली जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूल हा महत्त्वकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरत असून नुकतेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ना.दादा भुसे यांनी या उपक्रमाचा सर्व आढावा सांगली जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून घेतला. एका दृष्टीने मॉडेल स्कूल या उपक्रमामुळे सांगली जिल्ह्याचा नावलौकिक राज्यात वाढत असल्याने व सदर उपक्रमाचे उत्तम सादरीकरण केल्याने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा या बैठकीच्या वेळी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाकडून सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावरती तब्बल दोन ते अडीच तास सविस्तर मॅरेथॉन चर्चा करण्यात आली. सर्वच प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी संबंधित टेबल वरील लिपिक, अधीक्षक व कक्ष अधिकारी यांना दिले.
या बैठकीमध्ये प्राथमिक शिक्षकांचे पगार एक तारखेला करणे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांच्या पदोन्नत्या तात्काळ करणे, पदोन्नती मागणाऱ्या शिक्षकांची माहिती मागून पदोन्नती प्रक्रिया राबवणे, वरिष्ठ वेतन श्रेणी,निवड श्रेणीचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे, सेवेत कायम, हिंदी मराठी सूट या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देणे, पुढील शिक्षणास परवानगीचे प्रस्ताव अनेक दिवसापासून प्रलंबित असून ते तात्काळ मंजूर करणे, सांगली जिल्हा परिषदेकडे नियुक्त झालेले नवनियुक्त शिक्षण सेवक हे इतर सेवा सोडून शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचे सेवाजोड प्रस्तावांची विहित नमुन्यात मागणी करून त्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देणे, भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणे, वैद्यकीय बिले, पुरवणी बिले यांना तात्काळ मंजुरी देणे,तेहतीस टक्के भाषा, समाजशास्त्र व विज्ञान विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देणे, अतिरिक्त वेतन वाढ दिलेल्या शिक्षकांची सेवा पुस्तके पडताळणी करून तात्काळ फरक बिला सह वेतनाचा लाभ देणे, दोन हजार सहा पूर्वी जिल्हा बदलीने आलेल्या एकूण पाच पैकी तीन पेक्षा जास्त अतिउत्कृष्ट गोपनीय अभिलेख असणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त वेतन वाढ देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देणे, विविध प्रकारच्या रजा तात्काळ मंजूर करणे, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, विद्यार्थी क्रीडा स्पर्धा, स्काऊट गाईड मेळावा आयोजित करणे, जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परिक्षा, डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा शालेय वेळेत घेणे यासह अनेक प्रलंबित प्रश्नावर तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा करण्यात आली. सदरचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात येतील, असा विश्वास शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिला.
यावेळी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांचे नातू अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक, समन्वय समितीचे सचिव अमोल माने, सरचिटणीस तथा शिक्षक बँकेचे संचालक राहुल पाटणे, तालुका अध्यक्ष भारत क्षिरसागर, धनाजी साळुंखे ,बाळू गायकवाड, संभाजी ठोंबरे, विजय साळुंखे, यशवंत गोडसे, संजय खरात, कृष्णा सावंत यांच्या सह सत्यजित यादव, बाबा वरेकर ,संदीप पवार, संभाजी हंकारे, महंम्मदअली जमादार, प्रवीण एटम, नंदकिशोर महामुनी, सागर कांबळे, प्रकाश पवार, उदय चव्हाण, उत्तम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.