उपनगराध्यक्षपद अधिकाराचे नव्हे, प्रतिष्ठेचेच ; मंगरुळपीर नगरपालिकेत पदासाठी जोरदार लॉबिंग, सहलींचेही नियोजन

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला असून इच्छुक नगरसेवकांची संख्या वाढत आहे. हे पद मिळवण्यासाठी स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग सुरू असली, तरी प्रत्यक्षात उपनगराध्यक्षपदाचे अधिकार मर्यादित असून ही लढाई अधिकारांपेक्षा राजकीय प्रतिष्ठा, ओळख आणि भविष्यातील समीकरणांसाठी असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारतीय संविधानाच्या ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर नगरपालिकांना घटनात्मक दर्जा मिळाला असला, तरी नगराध्यक्ष वा उपनगराध्यक्षांना स्वतंत्र, थेट अधिकार बहाल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९६५ नुसार उपनगराध्यक्षांची भूमिका ही सहाय्यक स्वरूपाची आहे. नगराध्यक्ष अनुपस्थित असतील, आजारी असतील किंवा पद रिक्त असेल, तेव्हाच उपनगराध्यक्षांना सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार असतो. अन्य वेळी नगराध्यक्षांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या किंवा सर्वसाधारण सभेने ठरवलेल्या मर्यादित कामकाजापुरतेच त्यांचे अधिकार राहतात.
प्रशासकीय यंत्रणेवर थेट आदेश देणे, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे किंवा स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेणे हे अधिकार उपनगराध्यक्षांकडे नसून ते नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्वसाधारण सभेकडे केंद्रीत आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष आणि सामान्य नगरसेवक यांच्यात अधिकारांच्या बाबतीत फारसा फरक राहत नाही. मात्र, पद मिळाल्यास राजकीय वजन वाढते, नावापुढे पदाची ओळख लागते, यामुळेच या पदासाठी चुरस वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकभाऊ परळीकर विजयी झाले आहेत. २१ सदस्यांच्या नगरपालिकेत भाजप १०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५, काँग्रेस १, एमआयएम १, शिवसेना (शिंदे गट) १ तर अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. स्वीकृत सदस्य, उपनगराध्यक्ष तसेच पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण व नियोजन या महत्त्वाच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना उधाण आले आहे.
फोडाफोडीच्या भीतीने अनेक पक्षांनी आपल्या नगरसेवकांना ‘सहली’वर किंवा अज्ञात स्थळी पाठवण्याची तयारी सुरू केल्याचेही समजते. विरोधी गटाकडून गळाला लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षप्रमुखांकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, मंगरुळपीरच्या राजकारणात येत्या काही दिवसांत घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.