शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
भायखळा प्रतिनिधी | अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भायखळा विभागात शिवप्रेमी तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषांच्या निनादात आणि देशभक्तीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत हा उत्सव साजरा करण्यात आला.
देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना भायखळ्यातील भीमनगर परिसरात या उपक्रमाने विशेष लक्ष वेधून घेतले. शिवरायांचा आदर्श केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता समाजहिताच्या कृतीतून जपण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. “शिवरायांचा वारसा म्हणजे शौर्याबरोबरच शिक्षण, संघटन आणि समाजकल्याण” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यंदाच्या शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. वेशभूषा स्पर्धेत बाल शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे सजीव दर्शन घडले. चिमुकल्यांनी साकारलेली ही ऐतिहासिक रूपे उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.
कार्यक्रमादरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. शिवजयंतीला सामाजिक आशय प्राप्त झाल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करण्यात आले.
नवतरुण उत्सव मंडळाच्या वतीने आणि स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, शालेय साहित्याचे संच वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा खरा यशस्वी क्षण ठरला. “शिवरायांचा आदर्श म्हणजे दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे” हे या कृतीतून अधोरेखित झाले.
स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज कदम, जितेंद्र कदम, सुजल शिर्के, रोहन कांबळे, तुषार सरोदे, सुजल पवार, प्रतिक पवार, अक्षय पवार, आदर्श जाधव, आशिष जाधव, योगेश गायकवाड, चंदन ठाकूर, जय सुर्वे, सुमेध सुर्वे, आदिराज जाधव, कार्तिक शिर्के, मोक्ष आगाणे, नितीन सोनवणे, मुकेश शिर्के, राकेश शिर्के, श्रीकांत वाढाणे, स्वप्निल रोकडे आदींनी परिश्रम घेतले.