महाराष्ट्रसामाजिक

शिवप्रतापाचे शिल्प बसविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार ; खा. उदयनराजे भोसले

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतापगड विकास प्राधिकरणाची बैठक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते.

बैठकीदरम्यान प्रतापगडाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषतः शिवप्रतापाचे म्हणजेच अफजलखान वधाचे शिल्प बसविण्याबाबत ठोस चर्चा पार पडली.

हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले की, “शिवप्रतापाचे शिल्प तयार होऊन वर्ष उलटले आहे, मात्र पाऊस, निवडणूक आचारसंहिता आदी कारणे सांगून अद्याप ते बसविले गेलेले नाही. राजकोट व पुणे येथे इतर ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे पुतळे बसविण्यात आले, मग प्रतापगडावर हे शिल्प का नाही? तसेच त्यांनी इशारा दिला की, जर २७ नोव्हेंबर २०२५ या शिवप्रताप दिनापर्यंत शिल्प बसवले गेले नाही, तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्वतः अफजलखानाच्या थडग्याशेजारी प्रतीकात्मक शिल्प उभारतील.

प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य मिलिंद एकबोटे म्हणाले की, “शिवप्रतापाचे शिल्प बसविण्याची मागणी योग्य आहे. हे शिल्प अफजलखानाच्या थडग्याजवळ बसवल्यास शिवरायांच्या पराक्रमाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढेल व शासनाचा महसूलही वाढेल.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, “या विषयावर दोन ते चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतापगड विकास प्राधिकरण सदस्य व हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन शिल्प बसविण्याबाबत चर्चा होणार आहे.

यावेळी नितीन शिंदे यांनी तयार असलेल्या शिल्पाचा फोटो अधिकाऱ्यांना दाखवला. बैठकीदरम्यान, एका अधिकाऱ्याने अफजलखानाच्या थडग्याला “समाधी” असा उल्लेख केल्यावर शिंदे यांनी त्याला दुरुस्त करत ठणकावले की, “समाधी नव्हे, अफजलखानाचे थडगे म्हणा.

बैठकीस हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, अनिरुद्ध कुंभार, अरविंद येतनाळे, गजानन माने, प्रेम देसाई, यश पाटील, अभिजीत बारटक्के, संतोष शेंडे, सागर पावशे, अस्मिता लाड, राजू शेडगे, विजय नायडू आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही