विहिरीतील मृतदेह शोधण्यात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनला यश

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरूळपीर तालुक्यातील कोष्टीपुरा येथे आत्महत्येसाठी विहिरीत उडी घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शोधून काढला. या पथकाच्या धाडसी प्रयत्नांमुळे शोध मोहीम यशस्वी ठरली.
आत्महत्येपूर्वी केलेला फोन
कोष्टीपुरा येथील संजय जयराम नवरे (वय ५५ वर्षे) यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत नातेवाईकांना फोन करून कळवले होते की, “मी विहिरीत उडी मारत आहे.” ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. शहरालगतच्या शेतातील एका विहिरी जवळ त्यांचा मोबाईल व चप्पल आढळल्याने ते याच विहिरीत असल्याचा संशय बळावला.
पोलिसांची तत्परता
ही माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिस ठाण्याचे एपीआय एम. जी. वाघमोडे यांनी विलंब न लावता मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर शाखा यांच्याशी संपर्क साधला. पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना घटनेची माहिती देऊन तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले.
बचाव पथकाची कामगिरी
सदाफळे यांनी सहकारी अतुल उमाळे, शेखर केवट, ऋषीकेश राखोंडे, शुभम भोपळे व शिवा अडात यांना आवश्यक शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी आणले. एपीआय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू करण्यात आली. अवघ्या एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर पथकाने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले व तो पोलिसांच्या ताब्यात सोपवला.
गावकऱ्यांच्या मदतीने ऑपरेशन यशस्वी
या कारवाईदरम्यान मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे एपीआय वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण लोणकर, मृताचे नातेवाईक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे विहिरीतील मृतदेह बाहेर काढून जवळपास एक किलोमीटर रस्त्याने नेण्यासाठी बचाव पथकाला मोठा संघर्ष करावा लागला.
सेवाभावी कार्यामुळे मिळाली दाद
स्थानिक ग्रामस्थांनी या धाडसी मोहिमेसाठी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांचे कौतुक केले. अनेक वेळा अशा गंभीर प्रसंगी प्रशासन व पोलिसांसोबत या पथकाने दाखवलेली तत्परता आणि सेवाभाव गावकऱ्यांच्या जीवात जीव आणणारा ठरत असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर मृतदेह शोधण्यात आलेल्या या मोहिमेतून पुन्हा एकदा मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या धाडसी व सेवाभावी कार्याची ठळक छाप उमटली आहे.