शेळी गट खरेदीचा स्थानिक बाजारात निर्णय कधी होणार? ; महादेव दबडे

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेतील गाय- म्हैशीं परराज्यात खरेदीचा निर्णय रद्द करुन तो स्थानिक बाजारात करण्याचा दिलासादायक निर्णयाप्रमाणे शेळी गट स्थानिक बाजारात खरेदीचा निर्णय कधी होणार असा सवाल लाभार्थ्यांतून होत आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत अनुदानावर राबविलेली गाय-म्हैस व शेळ्या गट खरेदीची योजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जाते. यापूर्वी जनावरांची खरेदी ही स्थानिक बाजारात होत होती मात्र शासनस्तरावर दुधाळ जनावरे परराज्यात खरेदीचा घेतलेला निर्णय लाभार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरला. परराज्यातील जनावरे खरेदीमुळे दुधात फरक पडेल असा या मागचा हेतू होता. विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना वाहतुकीचा बुर्दंड सोसत नाईलाजास्तव कर्नाटकमध्ये जनावरांची खरेदी करावी लागली. मात्र ही जनावरे फायदेशीर ठरण्याऐवजी लाभार्थ्यासाठी नुकसानीची ठरली. शासनाचा दुध वाढीचा हेतू बदलत्या वातावरणामुळे असफल ठरला, त्या राज्यातील जनावरांना जिल्ह्यातील वातावरण पोषक ठरले नाही. परिणामी जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला. येथील वातावरण जनावरासाठी घातक ठरु लागल्याने लाभार्थ्यांचा पराज्यातील जनावरे खरेदीला विरोध होवून स्थानिक बाजाराची मागणी होवू लागली. पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे दुधाळ जनावरे स्थानिक बाजारात खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. आहे. त्याच प्रमाणे शेळी गट स्थानिक बाजारात खरेदीचा निर्णय कधी होणार? असा सवाल होत आहे. शेळी गट खरेदी स्थानिक बाजाराऎवजी रांजणी येथील अहिल्यादेवी होळकर मेंढी पालन फार्ममध्येच करावी अशी अट आहे. ही अट नुकसानकारक ठरत असल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी असून शेळी गटाची खरेदीही पूर्वीप्रमाणे स्थानिक बाजारात करण्याची मागणी आहे. पशुसंवर्धन विभागाच्या निर्णयाची लाभार्थ्यांना प्रतिक्षा आहे.
दुधाळ जनावरे खरेदी नुकसानकारक ठरली तीच अवस्था शेळी गटाची ; महादेव दबडे, (मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट)
“ज्याप्रमाणे परराज्यातील दुधाळ जनावरे खरेदी नुकसानकारक ठरली तीच अवस्था शेळी गटाची आहे. रांजणीच्या मेंढी फार्ममध्येच खरेदीची अट आहे. प्रत्यक्षात ही जनावरे दलालांकडून घेण्यास भाग पाडले जाते. दलालाकडून शेळ्यांना फाॅस्फरस इंजेक्शन, गव्हाच्या कणकीचा होणारा वापर यामुळे त्यांना पेंड, मका खाद्याची सवय नसल्याने या शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. नुकसानकारक अटीमुळे शेळी गट खरेदीकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. ही शेळ्यांची खरेदीही स्थानिक बाजारात करावी.