शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून एकल महिलांना आधार ; शबाना शेख व ‘सांऊ एकल महिला संस्था’ चा उपक्रम

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | समाजातील विधवा व एकल महिलांच्या मुलींना शिक्षणासाठी पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘सांऊ एकल महिला समिती’ व ‘डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने अंकली येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 27 एकल महिलांच्या गरजू मुलींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शबाना शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. विविध शाळांमधील मुलींना वह्या, लेखन साहित्य, छत्री, टिफिन बॉक्स, कंपास बॉक्स, सॅनिटरी पॅड्स व अन्य उपयुक्त शालेय साहित्य वाटण्यात आले. या उपक्रमामुळे शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलींना खऱ्या अर्थाने हुरूप मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या प्रसंगी बोलताना शबाना शेख म्हणाल्या, “महिलांनी आपल्या व मुलांच्या उज्वल भविष्याचा विचार करून पुनर्विवाहाचा सकारात्मक विचार करावा. समाजाच्या बंधनांवर मात करत महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली पाहिजे. आमची संस्था त्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शिक्षण हेच मुलांचे भविष्य घडवते. संस्थेने आजवर अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन दिले असून यापुढेही हे कार्य सुरु राहणार आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामीण पोलीस स्टेशन सांगलीचे पोलीस अधिकारी रामदास बांगडे यांनी भूषविले. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनी व पालकांशी संवाद साधत मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली. “पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नाते ठेवले पाहिजे. त्यांना मोबाईलचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.
बांगडे सरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, गेल्या 14-15 वर्षांपासून ही संस्था समाजातील विधवा व एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या या योगदानामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहे.
या वेळी अंकली ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी ऋतुजा सुतार, पोलीस पाटील शिल्पा घोलप व इतर मान्यवर उपस्थित होते. लाभार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या मातांनी संस्थेच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.