श्यामभाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; साधेपणातून समाजसेवेचा आदर्श

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शेलुबाजार येथील प्रसिद्ध कापूस व्यापारी व अमरदास बँकेचे संचालक श्यामभाऊ अग्रवाल यांनी आपला वाढदिवस यंदा एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शेलुबाजार येथे जाऊन विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे मोफत वाटप करून आपला वाढदिवस साध्या पण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, कंपास, रंग, वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ शैक्षणिक मदत म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आला होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला मांगाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “श्यामभाऊ अग्रवाल यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून जे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे ते कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि समाजात शिक्षणाची खरी गरज अधोरेखित होते.”
वाढदिवसानिमित्त आपले विचार मांडताना श्यामभाऊ अग्रवाल म्हणाले, “वाढदिवस फुगे, केक आणि मोठ्या खर्चाने साजरा करण्याऐवजी जर त्या पैशाचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांसाठी केला, तर त्याचा खरा उपयोग समाजासाठी होतो. आजच्या युगात शिक्षण ही सर्वात मोठी गरज आहे. जिल्हा परिषद शाळा ही गोरगरिबांची शाळा आहे. त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करणं हीच खरी समाजसेवा आहे. आपल्या आनंदात समाजातील दुर्लक्षित घटकांना सहभागी करून घेतल्यास समाजात खऱ्या अर्थाने बदल घडतो.”
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रकाश अग्रवाल, विलास लांभाडे, पवन बजाज, बंडूभाऊ वैद्य, अजय अग्रवाल, बाळकृष्ण रोकडे, शाळा समितीचे प्रकाश अपूर्वा, केंद्रप्रमुख सुरेश राऊत, देशमुख, गिरी कांबळे तसेच शाळेतील शिक्षक कोकरे, ठाकूर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनीही अग्रवाल कुटुंबीयांचे कौतुक भरभरून केले. हा कार्यक्रम केवळ एक शैक्षणिक साहित्य वाटप नव्हे, तर समाजासाठी एक जागृतीचा संदेश होता की साधेपणातही मोठेपण असते, आणि मदतीचा खरा अर्थ गरजूंपर्यंत पोहोचण्यात आहे. श्यामभाऊ अग्रवाल यांच्या या कृतीमुळे समाजात एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.