श्रद्धा नावाला, लूट खिशाला
भोंदू बाबा प्रशासनाच्या रडारवर
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यात भोंदूगिरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषणाचा खेळ आता उघड्यावर येऊ लागला आहे. अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाल्यानंतरही स्थानिक पातळीवर अनेक भोंदूबाबा निर्धास्तपणे आपले जाळे विणत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज निर्माण झाली आहे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सीमारेषा पुसट होत चाललेल्या या काळात काही तथाकथित बाबा लोकांच्या भावनांवर डल्ला मारत आहेत. आजार बरे करण्याचे, नोकरी लावून देण्याचे, वैवाहिक अडचणी दूर करण्याचे, अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवत भोळ्या नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे. “देवकार्य”च्या नावाखाली हजारो रुपयांची उकळपट्टी केली जात असून, भीती आणि अंधविश्वासाच्या जोरावर लोकांना गप्प बसवले जात असल्याचे चित्र आहे.
वाशिमसह मंगरुळपीर तालुक्यात अशा संशयित भोंदूबाबांची संख्या वाढत असल्याची चर्चा आहे. गावागावात ‘चमत्कार’च्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असून, प्रशासन मात्र केवळ पाहत बसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये महिलांवर मानसिक व शारीरिक अत्याचार झाल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत, ही बाब अधिकच गंभीर आहे.
अशोक खरात प्रकरणाने भोंदूगिरीचे भयावह वास्तव समोर आणले असताना, अशाच प्रकारची ‘खरात पॅटर्न’ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने मोहीम राबवणे आवश्यक आहे. संशयित बाबांची माहिती गोळा करून त्यांच्यावर कडक कारवाई, सापळे रचून पुरावे गोळा करणे आणि दोषींना बेड्या ठोकणे हीच काळाची गरज आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही भोंदू बाबाच्या संशयास्पद हालचाली, फसवणूक किंवा गैरवर्तन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भीती झटकून पुढे येणाऱ्या नागरिकांच्या मदतीनेच या भोंदूगिरीला आळा बसू शकतो, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना आता समाजानेच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. अन्यथा श्रद्धा नावाला, लूट खिशाला हा खेळ असाच सुरू राहणार आणि सामान्य नागरिकच त्याचे बळी ठरणार, यात शंका नाही.