श्रद्धेच्या मंदिरात विकासाची महापूजा ; सुरेशभाऊंचा निधी ठरला वरदान

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | शहराचं ग्रामदैवत, श्रद्धेचं प्रतीक असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अखेर मोठ्या कामाला गती मिळाली आहे. भाजपाचे नेते व माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अथक पाठपुराव्याने महाराष्ट्र शासनाकडून पाच कोटींचा भक्कम निधी मंजूर झाला असून, या निधीतून सुरु झालेल्या नूतनीकरणाचा स्लॅब शुभारंभ नुकताच आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला सौ. सुमनताई सुरेशभाऊ खाडे, सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, भाजपाच्या युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर, बाबासाहेब आळंदीकर, चैतन्य भोकरे, अनिता हारगे, रूपाली देसाई आदींसह मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.
सण १६५० ते १७०० या काळातील पुरातन इतिहास लाभलेलं हे मंदिर, मिरजवासीयांचं नुसतंच श्रद्धास्थान नसून **संस्कृती, परंपरा आणि भक्तीचं केंद्रबिंदू आहे. दरवर्षी येथे नवरात्रोत्सव, सनई-मंगलवाद्यांचा गजर, महाअभिषेक, आरत्या, पालखी सोहळे, किर्तन-प्रवचन-भजन अशा वैभवशाली धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
विशेषतः नवरात्रीत भरणारी यात्रा आणि नवरात्र संगीत महोत्सव संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरते. देशभरातून मोठे कलाकार येथे हजेरी लावतात. हे सर्व पाहता मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज मोठ्या प्रमाणावर जाणवत होती.
सुरेशभाऊंनी ही गरज ओळखली, मनापासून निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला व अखेर पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला. विशेष म्हणजे, मंदिराच्या मूळ गाभाऱ्याला धक्का न लावता, पुरातन वास्तुशैलीतच दगडी बांधकामामधून सभामंडपाची भव्य उभारणी सुरू आहे. हे काम म्हणजे केवळ विकास नव्हे, तर श्रद्धेचं नूतनीकरण आहे.
देवळाचं सौंदर्य वाढवताना, भक्तांचं भावविश्व अबाधित ठेवायचं, हे भान ठेवून काम सुरु असल्यामुळे जनतेत समाधानाचं वातावरण आहे. लवकरच हे मंदिर अधिक सुंदर, अधिक भव्य आणि भक्तांसाठी अधिक आकर्षक रूपात समोर येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी अंबाबाईच्या चरणी एक महत्त्वपूर्ण अर्पण केलं असून, हे केवळ धार्मिक ठिकाण नव्हे तर मिरजच्या सांस्कृतिक वैभवाचा नवा अध्याय ठरणार आहे.