संखमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय स्थलांतराला विरोध ; १२ डिसेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शहर प्रतिनिधी | श्रीकांत यमगर
जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालय मौजे उमदी येथे हलविण्याच्या प्रस्तावाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या निर्णयाविरोधात संख ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते संतोष साधुराय कुंभार यांनी दि. १२ डिसेंबर २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन संख येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात येणार आहे.
संतोष कुंभार यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी (जत) यांना सविस्तर निवेदन दिले असून, त्यात संख गावावर होणाऱ्या अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, संख हे जत तालुक्याच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असून येथे आधीपासूनच सर्व मूलभूत शासकीय सुविधा उपलब्ध आहेत.
संख हे प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र
संख येथे महसूल मंडळ, अप्पर तहसीलदार कार्यालय, न्यायालय, महाविद्यालय, वीज वितरण केंद्र, बाजारपेठ, दळण-वळणाची साधने यासह अनेक सोयी-सुविधा कार्यरत आहेत. विशेष म्हणजे २०१८ पासून संख येथील महसूल व प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीत हे कार्यालय दुसरीकडे हलविणे म्हणजे जनतेवर अन्याय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थलांतरामुळे नागरिकांचे नुकसान
अप्पर तहसीलदार कार्यालय उमदी येथे हलविल्यास संख व परिसरातील हजारो नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागणार असून, ग्रामीण भागातील वृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच सरकारी कामकाजासाठी लागणारा वेळ आणि आर्थिक खर्च वाढणार असल्यामुळे सामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
मौजे उमदी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा. संख येथील विद्यमान महसूल मंडळ व अप्पर तहसीलदार कार्यालय संख येथेच कार्यरत ठेवावे. संख गावास तात्काळ स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. अश्या या आंदोलनांतर्गत मागण्या करण्यात आल्या आहेत.
संतोष कुंभार यांनी सांगितले की, प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेतली नाही तर दि. १२ डिसेंबर २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले जाईल. या उपोषणात संख ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.