सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार न्याय ; शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या पुढाकाराने बैठक यशस्वी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे सफाई कामगारांच्या वारसांसाठी न्याय मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिष्ठाता डॉ. गुरव यांची भेट घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात यासंदर्भात सखोल चर्चा झाली.
या बैठकीमध्ये खास करून अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला, जे कर्मचारी इतर पदावर असले तरी त्यांनी सेवा काळात सफाईशी निगडित कामे पार पाडलेली आहेत. या संदर्भात लाड समितीच्या शिफारशीनुसार आणि २४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन परिपत्रकाच्या आधारे योग्य तो अहवाल तयार करून शासनाच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी विनंती करण्यात आली.
डॉ. गुरव यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, आस्थापना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले असून वरिष्ठ कार्यालयाकडे लवकरच सकारात्मक प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला चालना मिळाली असून सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासन धोरणानुसार, सफाई कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सर्व शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावी यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील आहे, असे जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी स्पष्ट केले. याच पुढाकारामुळे सदर बैठक यशस्वी ठरली.
या बैठकीस तालुकाप्रमुख महादेव सातपुते, स्वप्नील मस्कर, राजेंद्र आंबी, आशिष साळुंखे, ढोबळे, कांबळे यांच्यासह अनेक सफाई कर्मचारी व त्यांच्या वारसांची उपस्थिती होती.