विदर्भसामाजिक

“समाजाच्या आनंदामागे पोलिसांचा अहोरात्र संघर्ष” ; ठाणेदार किशोर शेळके

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

होळी हा आनंद, उत्साह आणि रंगांचा सण. सर्वसामान्य नागरिक जेव्हा मोठ्या जल्लोषात सण साजरा करत होते, तेव्हा खाकी वर्दीतील शेकडो चेहरे मात्र रस्ते, चौक आणि पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर तैनात होते. समाज जेव्हा सुखाने सण साजरा करतो, तेव्हा त्या आनंदामागे आणि शांततेमागे पोलीस दलाचा अहोरात्र सुरू असलेला संघर्ष कारणीभूत असतो, असे प्रतिपादन मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार किशोर शेळके यांनी केले.

होळी सणाच्या बंदोबस्तावरून परतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व पोलिस बांधवांना फराळ व मिठाईचे वाटप करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. आपण जनतेचे सेवक आणि रक्षण करणारे सैनिक आहोत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, असेही ते म्हणाले.

केवळ गुन्हेगारी नव्हे, माणुसकीचेही रक्षण

पोलीस दलाचे काम केवळ गुन्हे दाखल करणे किंवा कायदा-सुव्यवस्था राखणे इतकेच मर्यादित राहिलेले नाही. अपघाताच्या वेळी देवदूत बनून मदतीला धावणे, हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर राहणे तसेच सायबर गुन्ह्यांच्या विळख्यातून नागरिकांना वाचवणे अशा अष्टपैलू भूमिका पोलीस बजावत आहेत. नैसर्गिक आपत्ती असो वा आणीबाणीचा काळ, मदतीसाठी सर्वप्रथम पुढे येणारा हात खाकी वर्दीचाच असतो.

वाढती आव्हाने, तरीही सक्षम पोलीस

बदलत्या तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे स्वरूप ‘डिजिटल’ झाले असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दल आधुनिक यंत्रणांनी सज्ज होत आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता, वाढता कामाचा ताण आणि मानसिक दडपण ही आव्हाने आजही कायम आहेत. तरीही प्रतिकूल परिस्थितीतही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

स्वतःचे घर मागे, समाजाचे रक्षण पुढे

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सण, वाढदिवस किंवा कौटुंबिक आनंद अनेकदा दुय्यम ठरतो. स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाचे रक्षण महत्त्वाचे मानणाऱ्या या योद्ध्यांचा वैयक्तिक संघर्ष अनेकदा पडद्यामागेच राहतो. ‘ड्युटी’ हेच त्यांचे पहिले घर आणि कर्तव्य हाच त्यांचा धर्म बनतो.

नागरिक म्हणून कायद्याचे पालन करणे, तपासात पोलिसांना सहकार्य करणे आणि त्यांच्या कामाचा आदर करणे, हाच त्यांच्यासाठी खरा सन्मान ठरेल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही