उपोषणकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार ; पंचायत समितीवर निघणार सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मालगाव ( ता. मिरज ) येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीस गैरहजर होते त्याबरोबर दप्तर चौकशीतही अनेक त्रुटी व अनियमितता स्पष्ट झाली असताना जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ दि. २२ आँगस्टला पंचायत समितीवर सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांना देण्यात आले आहे.. कारवाई न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचेही नियोजन आंदोलकांनी केले आहे.
मालगाव ग्रामपंचयतीत साजरा करण्यात आलेल्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीला जाणीवपूर्वक उपस्थित न राहिल्याने तसेच ग्रामपंचायत गैरकारभार करणाऱ्या सुरेश जगताप या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मालगावचे उपसरपंच मा. तुषार खांडेकर यांचे लोकशाही मार्गाने बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 पासून मिरज पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा सातवा दिवस असल्याने उपोषणकर्ते तुषार खांडेकर यांनी केलेल्या अन्न त्यागामुळे त्यांची तब्येत खालावली असून त्यांना अशक्तपणा, छातीत जळजळ डोके जाम होवून अशक्तपणा वाढत आहे. असे असताना जिल्हा परिषदेने कारवाई करण्याबाबत जाणीवपूर्वक घेतलेल्या झोपेच्या सोंगामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी मिरज पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
उपोषणकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील तसेच या मोर्चात कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही जाहीर निषेध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या गुरुवारी सकाळी ११ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे.
यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ.महेश कुमार कांबळे, सचिन दादा कांबळे, विज्ञान माने, मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सुभाष तात्या खोत, अभिजीत शेडबाळे, प्रदीप सावंत, निलेश सावंत, जावेद मुल्ला, निपू भैया परदेशी, कपिल कबाडगे, मंगेश यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.